न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी चऱ्होली बु. येथील पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेला अचानक भेट देत विद्यार्थ्यांना डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) अंतर्गत दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक साहित्याची तपासणी केली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शैक्षणिक साहित्याचा दर्जा व उपयोग याविषयीची माहिती जाणून घेतली.
शाळेतील जवळपास ९०% विद्यार्थ्यांना साहित्य मिळाले असून, उर्वरित विद्यार्थ्यांना तातडीने साहित्य वाटप करण्याचे आदेश देण्यात आले. काही विद्यार्थ्यांना गणवेश व शूज मिळाले नसल्याचे लक्षात येताच दोन दिवसांत वाटपाचे निर्देश देण्यात आले.
शाळेतील स्वच्छतागृह, वर्गखोल्या, वायरिंग, सीसीटीव्ही आणि पोषण आहाराचीही तपासणी करण्यात आली. शाळेतील वर्गखोल्या वाढवण्यासंबंधी प्रस्ताव पाठवण्याचे व प्रवेशद्वार मोठे करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.
“विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शासकीय सुविधांचा दर्जा आणि वापर याची खातरजमा करण्यासाठी अचानक भेटी सुरूच राहतील.”
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका..










