- शहरातील सर्वच नाल्यांच सर्वेक्षण पुर्ण..
- अनधिकृत नाल्यावरील अतिक्रमणांवर लवकरच हातोडा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑगस्ट २०२५) :- हिंजवडी परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने व पुरस्थिती निर्माण झाल्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सतर्क झाली आहे. शहरातील नाले तुंबुन पुर परिस्थिती उद्भवू नये यासाठी महापालिकेने नाल्यावरील अतिक्रमणांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने संपूर्ण शहरातील नाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, लवकरच अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू होणार आहे. यामध्ये खास करून रहदारीच्या मार्गावरील तसेच पूरप्रवण क्षेत्रातील नाले व त्यांच्या सभोवताली झालेली बेकायदेशीर बांधकामे हटवली जाणार आहेत.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त
अतुल पाटील म्हणाले, “हिंजवडी परिसरात पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा अभ्यास करून आम्ही तत्काळ उपाययोजना आखत आहोत. पिंपरी-चिंचवड शहरात अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये, यासाठी नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. सर्वेक्षण पूर्ण झाले असून, लवकरच प्रत्यक्ष कारवाई सुरू होईल.”
ते पुढे म्हणाले, “अतिक्रमणामुळे नाल्यांची नैसर्गिक वाहिनी अडवल्याने शहरात पाणी साचण्याचा धोका वाढतो. या कामात कोणताही राजकीय किंवा सामाजिक हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. महापालिकेच्या या पावलामुळे शहरात संभाव्य पूरस्थिती रोखण्यास मदत होणार असून, नागरिकांनीही अतिक्रमण करण्याचे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.











