न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑगस्ट २०२५) :- पिंपरी कॅम्प परिसरात शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) दुपारी एक वाजता धक्कादायक घटना घडली.
एका अज्ञात दुचाकीस्वाराने दुकानासमोर बसलेल्या तरुणाच्या पायावर गोळी झाडली. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भावेश काकरानी (रा. पिंपरी कॅम्प) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गळ्यातील चेन खेचण्याच्या प्रयत्नात झालेल्या प्रतिकारामुळे चोरट्याने गोळीबार केला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. मात्र, पोलिसांना या हल्ल्याच्या पार्श्वभूमीबाबत वेगळाच संशय असून, घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास सुरू आहे.
घटनेनंतर पिंपरी पोलीस ठाण्याचे अधिकारी, गुन्हे शाखा व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून, हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी भावेशकडून सविस्तर माहिती घेतली असून त्याचा मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड्स आदींची तपासणी केली जात आहे. पोलिसांकडून या घटनेचा हरतऱ्हेने तपास सुरू आहे.


















