न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका पदव्युत्तर संस्था वायसीएम रुग्णालयात बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी नवीन इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स हे महाविद्यालय ६० विद्यार्थी क्षमतेसह सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाची अटी व शर्तींसह मान्यता प्राप्त झाली आहे. याची माहिती अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.
या महाविद्यालयासाठी नवीन ११ मजली इमारतीतील तिसरा, चौथा व सहावा मजला वापरण्यात येणार आहे. सन २०१८ मध्ये सुरु झालेल्या पदव्युत्तर संस्थेच्या यशस्वी कार्यानंतर नर्सिंग शिक्षणाची गरज ओळखून पालिकेने पुढाकार घेतला.शासनाच्या विविध निर्णयांनंतर MUHS नाशिक विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून प्रथम संलग्नता मिळाली आहे.
या उपक्रमामुळे शहरातील नर्सिंग मनुष्यबळ वाढीस हातभार लागेल. प्रवेश प्रक्रिया CET Cell, मुंबईमार्फत पार पडणार असून, स्थानिक उमेदवारांना अल्पदरात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांचे विशेष योगदान लाभले आहे.












