न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १८ जून २०२६) :- वाल्हेकरवाडीतील जिजामाता चौकात कारला कट मारल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्याने चिंचवड पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.
पहिल्या फिर्यादीनुसार, रस्त्यात कार थांबवण्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून काही तरुणांनी एका व्यक्तीस शिवीगाळ करून मारहाण केली तसेच त्याला मदतीला आलेल्या पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रातील युवकांनाही मारहाण केल्याचा आरोप आहे.
तर दुसऱ्या फिर्यादीत, कारला कट मारल्याबाबत जाब विचारल्याने वाद झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीने पोलीस भरती प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांना बोलावून मारहाण व धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चिंचवड पोलीस दोन्ही फिर्यादींच्या आधारे तपास करत असून नेमकी घटना काय घडली याचा शोध घेत आहेत.















