- पिंपरी विधानसभेतील भाजपा नगरसेवक झोपले होते? ; नगरसेवक शैलेश मोरे यांची उपरोधिक टीका
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०१९) :- राजकारणातील दिग्गज घराणेशाहीवर मात करून, मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी सलग दुसऱ्यांदा विजय संपादन केला. मावळ मतदार संघातील इतर मतदारसंघांप्रमाणेच पिंपरी विधानसभेतही भाजप शहराध्यक्ष तथा आ. लक्ष्मण जगताप व राज्यमंत्री दर्जा लोकलेखा समिती अध्यक्ष सचिन पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली भाजपनेच बारणेंच्या प्रचारात आघाडीवर राहून, त्यांचा प्रचार केला. पिंपरी विधानसभा मतदारसंघांतही घरोघरी जाऊन प्रचार करण्यात भाजप कुठेही मागे नव्हती. भाजपा कार्यकर्तेही जोमात मैदानात उतरले होते. यात शंका नाही. बारणे यांना यशस्वी करण्यासाठी पिंपरी विधानसभेतून शहर भाजपनेही प्रचंड मेहनत घेतली. त्याचेही हे फळ आहे, असे नमूद करावेच लागेल. मात्र, मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना ४१ हजार २९४ मतांची आघाडी मिळवून दिल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे, पिंपरीचे शिवसेना आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी एका कार्यक्रमात म्हटले आहे. त्यामुळे पिंपरी विधानसभेत केवळ आ. चाबुकस्वार यांच्यामुळेच खा. बारणे यांना मताधिक्य मिळाले आहे का? पिंपरी विधानसभेतील भाजप नगरसेवक झोपले होते का? की महायुतीत केवळ एकटा शिवसेना हा पक्ष वगळता इतर पक्ष नव्हते? असा संतप्त सवाल भाजपचे नगरसेवक शैलेश मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.
या पत्रकात शैलेश यांनी म्हटले आहे की, ”आ. चाबुकस्वार यांचे ‘तब्बल १९ दिवस पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे संपूर्ण पिंपरी मतदारसंघ आपण पालथा घातला’. ”ते पायाला भिंगरी लावून पळत सुटले होते तर, आम्ही काय गोट्या खेळत होतो का?” आम्हीही बारणे यांच्या प्रचारासाठी जंग-जंग पछाडत होतो. पिंपरी विधानसभेची मागील आकडेवारी काहीही असो, या वेळेस मात्र, पिंपरी विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद शिवसेनेपेक्षा कैक पटीने वाढलेली आहे. मोदींना पून्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी पिंपरी विधानसभेतील व प्रभाग १९ मधील सर्व मतदार शिवसेनेच्या बाजूने उभे राहिले व त्यांनी मोदींच्या विकासाला मतदान करीत खा. बारणे यांना आक्रमक मताधिक्य पिंपरी विधानसभेतून मिळवून देत, मोठा विक्रम प्रस्थापित केला.
त्यासाठी पिंपरी विधानसभेतील भाजपचे नगरसेवक शैलेश मोरे, विजय शिंदे, कोमल मेवानी, जयश्री गावडे, अनुराधा गोरखे, केशव घोळवे, शैलजा मोरे, शर्मिला बाबर, संदीप वाघेरे, बाबू नायर, आशा धायगुडे, सुजाता पलांडे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे व शहर भाजपा कार्यकारिणीतील पदाधिकारी, कार्यकर्ते व आदींनी महायुतीच्या झेंड्याखाली दिवसरात्र एक करीत खा. बारणे यांना विक्रमी मताधिक्क्याने विजयी केले. आ. गौतम चाबुकस्वार यांचाही या विजयात सहभाग आहे. यात दुमत नाही. परंतु, त्यांनी याचे श्रेय स्वतः न घेता, महायुतीतील प्रबळ व बलाढ्य पक्ष भाजप व त्यांचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनाही द्यावे. त्यांचाही मानसन्मान व्हायला हवा, असेही शैलेश मोरे म्हणाले.
विधानसभेतून आ. चाबुकस्वार हे स्वतःला शिवसेनेकडून प्रबळ दावेदार मानतात. त्यासाठी त्यांना या मतदारसंघात स्वतःला चर्चेत ठेवायचे आहे. त्यामुळे ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनासुद्धा या विजयाचे श्रेय देताना दिसत नाहीत. गत महापालिका निवडणुकीतही त्यांना स्वतःचा करिष्मा दाखवता आला नाही. त्या निवडणुकीत त्यांना साधा एक नगरसेवकही निवडून आणता आला नाही. गेल्या पाच वर्षात स्वतःचे संपर्क कार्यालय वगळता इतरत्र कुठेही न भटकणारे आमदार चाबुकस्वार हे म्हणतात ”मी पिंपरी विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना ४१ हजार २९४ मतांची आघाडी मिळवून दिली” हा आजवरचा सर्वात मोठा विनोद आहे”, अशी उपरोधिक टीकाही नगरसेवक मोरे यांनी या पत्रकात केली आहे.














