- चिटफंड कंपनीकडून गुंतवणुकदारांची ३ कोटी ८५ लाखांची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. 15 ऑगस्ट 2025) :- राजरत्न/राजयोग चिटफंड प्रा. लि. या कंपनीच्या संचालकांसह पाच जणांविरोधात ३ कोटी ८५ लाख ७५ हजार ९२९ रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा चिखली पोलिसांत दाखल झाला आहे. फिर्यादी सुभाष अभिमन्यु हिवाळे (वय ६२, रा. साईनाथनगर, निगडी) यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी संतोष रामदास बरबडे, एक महिला आरोपी, अभिजित हांडे, लक्ष्मण मुळे व अनिकेत हांडे यांनी संगणमत करून फिर्यादी व अन्य गुंतवणूकदारांना कमी कालावधीत जास्त परताव्याचे आमिष दाखवून चिटफंड योजनेत पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. पुर्णानगर, चिखली येथून ही योजना राबविण्यात आली.
फिर्यादीकडून ८.५० लाख, त्यांच्या एस.एस. पॉलिमर्स कंपनीकडून ३४.३२ लाख, भागीदार दत्तात्रय केळकदर यांच्याकडून ६.८७ लाख, तसेच इतर ३० हून अधिक गुंतवणूकदारांकडून वेगवेगळ्या रकमांची वसुली करण्यात आली.
सर्व मिळून ३ कोटी ८५ लाखांहून अधिक रक्कम आरोपींनी ठेवीच्या स्वरूपात घेतली. मात्र, मुदत संपल्यानंतरही मूळ रक्कम व परतावा न देता अपहार करून गुंतवणूकदारांची फसवणूक केली, असं फिर्यादीत नमुद आहे.
या प्रकरणी आरोपींवर भा. दं. सं. कलमसह बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम २०१९ चे कलम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास सपोनि गोमारे हे करत आहेत.












