न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दिनांक : २० ऑगस्ट २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहराला लवकरच दोन महत्त्वाची न्यायालये लाभणार आहेत. यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच वरिष्ठ स्तरावरील दिवाणी न्यायालय यांचा समावेश आहे. अलीकडेच या न्यायालयांना मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष सुरूवातीच्या हालचालींना गती मिळाली आहे. पिंपरीत जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू झाल्यास शहरातील नागरिकांना न्यायप्रविष्टतेसाठी मोठी सोय होणार आहे.
मोरवाडी येथील जुन्या न्यायालयीन इमारतीची पाहणी जिल्हा प्रमुख न्यायाधीश एम. के. महाजन यांच्या नेतृत्वाखाली न्यायाधीश शिंदे व वाघमारे यांनी केली. या इमारतीत पूर्वी न्यायालयीन कामकाज होत होते. मात्र जागेअभावी न्यायालये नेहरूनगरला स्थलांतरित करण्यात आली होती. आता पुन्हा या जुन्या इमारतीतच नवी न्यायालये सुरू करण्याचा विचार आहे.
पाहणीवेळी महापालिका अधिकारी, न्यायालयीन प्रशासकीय अधिकारी तसेच पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून आवश्यक सूचना देण्यात आल्या. इमारतीची डागडुजी, रंगरंगोटी आणि स्थापत्य विषयक कामे त्वरित पूर्ण करून न्यायालय लवकर कार्यान्वित करण्याचे निर्देशही देण्यात आले.
या वेळी पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश चव्हाण, न्यायाधीश अमुदी व गायकवाड उपस्थित होते. तर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गौरव वाळुंज, उपाध्यक्ष अॅड. अनिल पवार, सचिव अॅड. उमेश खंदारे, महिला सचिव अॅड. रिना मगदूम यांच्यासह अनेक वकील व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.












