न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२५ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने महिलांना घरबसल्या बचत गट नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ऑनलाईन प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन उप आयुक्त ममता शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रहाटणी येथील अंकुर महिला बचत गटातील विद्या निकम, कविता माने, भावना सपरिया यांच्यासह इतर सदस्यांना प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्रे देण्यात आली.
महानगरपालिकेच्या हद्दीत १० पेक्षा जास्त महिला एकत्र येऊन बचत गट स्थापन करू शकतात. या गटांच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला बचत करण्यासोबत आर्थिक सबलीकरणाची दिशा मिळते. यापूर्वी प्रमाणपत्र नोंदणीची प्रक्रिया ऑफलाईन होती. मात्र नव्या ऑनलाईन प्रणालीमुळे महिला घरबसल्या अर्ज करू शकतील आणि प्रमाणपत्र मिळवू शकतील.
महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवरून ही सुविधा उपलब्ध असून यामुळे वेळेची बचत होणार आहे. महिला बचत गट निर्मितीद्वारे आत्मनिर्भरतेकडे महिलांची वाटचाल अधिक वेगाने होईल, असा विश्वास समाज विकास विभागाने व्यक्त केला आहे.
“तंत्रज्ञानाच्या मदतीने महिलांसाठी ऑनलाईन प्रणाली उपलब्ध केली आहे. यामुळे प्रमाणपत्र जलद आणि सुलभ पद्धतीने मिळेल. महिलांनी याचा लाभ घ्यावा,” – ममता शिंदे, उप आयुक्त, समाज विकास विभाग…












