- पालिकेकडून जोरदार तयारी..
- मुख्य इमारतीच्या आवारात मंडप उभारणी; नागरिकांसाठी नोटीस बोर्डची व्यवस्था…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२५) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची प्रतिक्षित प्रारूप प्रभाग रचना आज शुक्रवारी २२ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर होणार आहे. महापालिकेने तयार केलेला चार सदस्यीय प्रभाग आराखडा नगरविकास विभागाला सादर करण्यात आला असून आता राज्य निवडणूक आयोगाची अंतिम मंजुरी घेतल्यानंतर तो प्रसिद्ध केला जाणार आहे.
यासाठी पालिकेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या आवारात मंडप उभारण्यात आले असून नागरिकांसाठी नोटीस बोर्ड लावण्यात आले आहेत. नागरिकांना प्रभाग रचना पाहण्यासाठी व त्यावर सूचना व हरकती नोंदविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
या प्रारूप आराखड्यावर नागरिकांना २८ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना नोंदवता येणार आहेत. त्यानंतर २९ ऑगस्टपासून सुनावणीची प्रक्रिया सुरू होईल. सुनावणी पूर्ण झाल्यावरच अंतिम प्रभाग रचना निश्चित करण्यात येईल.
यावेळी एकूण १२८ जागांचा प्रस्ताव असून त्यापैकी ६४ जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांची वाढती संख्या आणि शहराचा विस्तार लक्षात घेऊन प्रभाग रचना करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आता शहरवासीयांच्या नजरा २२ ऑगस्टकडे लागल्या असून, नव्या प्रभाग रचनेत कोणते बदल होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












