- चौकशीसाठी तज्ज्ञांची समिती स्थापनेचा आयुक्तांचा आदेश…
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२५) :- निगडी सेक्टर २७ मध्ये बीएसएनएलच्या फायबर केबल दुरुस्तीच्या कामादरम्यान चेंबरमध्ये गुदमरून तीन मजुरांचा १५ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. या घटनेच्या सखोल चौकशीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी तज्ज्ञांची समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत.
या दुर्घटनेत लखन धावरे, साहेबराव गीरशेटे आणि दत्तात्रय व्हनाळे या कामगारांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासानुसार, चेंबरमध्ये विषारी वायू साचल्यामुळे श्वसनाचा त्रास होऊन तिघांचे प्राण गेले. मात्र, प्रत्यक्षात चेंबर कोणत्या कामासाठी होते आणि घटना कशी घडली, याबाबत अजूनही शंका उपस्थित होत आहेत.
आयुक्त सिंह यांनी यासंदर्भात तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली, उपआयुक्त संदीप खोत व सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांचा समितीत समावेश आहे. या समितीला घटनेची पार्श्वभूमी, नेमके कारण तपासून अहवाल सादर करणे आणि अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.












