न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २२ ऑगस्ट २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र/भारत अभियान (नागरी) अंतर्गत “स्वच्छ सन्मान सोहळा व स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ पूर्वतयारी” कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवार, दि. २३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजता होईल, अशी माहिती आयुक्त व प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ तसेच खासदार, आमदार आणि अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेतलेल्या सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड शहराने देशात ७ वा आणि राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच ७ स्टार कचरामुक्त व वॉटर प्लस मानांकनही मिळाले आहे. या यशामध्ये नागरिक, लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था, अधिकारी-कर्मचारी यांचा मोठा वाटा असून त्यांच्या प्रतिनिधीक स्वरूपातील सन्मान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याचवेळी स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ पूर्वतयारीलाही प्रारंभ होणार आहे.












