न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण, दि. २२ ऑगस्ट २०२५ (प्रतिनिधी) :- मॅनपॉवर सर्व्हिसेस, आंबेठाण (चाकण) येथे बनावट कामगारांची नावे दाखवून रजा रोखीकरणाच्या बिलांमधून तब्बल २५ लाख ४८ हजार ४९० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी दोन जणांविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक केली आहे.
फिर्यादी राजेंद्र गोरे (वय ५०) यांच्या तक्रारीनुसार, आरोपी सिद्धाराम बसवराज रड्डे (रा. देवाची आळंदी) व विनोद भाउसाहेब आगरकर (रा. चाकण) हे दोघे कंपनीत अनुक्रमे सुपरवायझर व अकाउंटंट म्हणून कार्यरत होते. या दोघांनी संगनमत करून खोटे दस्तऐवज तयार केले. रजा रोखीकरणाच्या बिलामध्ये अस्तित्वात नसलेल्या कामगारांची नावे लावून बिल मंजूर करून घेतले आणि त्यातून मिळालेली रक्कम आपसांत वाटून घेतली.
या फसवणुकीत कंपनीची २५ लाखांहून अधिक रकमेची आर्थिक हानी झाली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मपोउपनि कदम अधिक तपास करीत आहेत.












