न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावर गरजू व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य व केंद्र शासनामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते, परंतु गेल्या चार- साडेचार वर्षात विविध वर्गातील विद्यार्थ्यांना सरकारच्या नियोजन शुन्य कारभारामुळे शिष्यवृत्तीपासून वंचित रहावे लागते.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शिष्यवृत्ती संदर्भात अडचणी येत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची येत्या ७ ऑक्टोबर रोजी ‘जाहीर शिष्यवृत्ती परिषद’ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना दिली.
एकीकडे वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, पडलेला शेतीभाव यामुळे विद्यार्थीवर्गांच्या पालकांना आपल्या पाल्याचे शिक्षण करणे अवघड होत असताना, दुसऱ्या बाजूला विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड होऊन बसले आहे.विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये शिष्यवृत्तीसंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे.
याकरिता जे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत अशा विद्यार्थ्यांनी दि. १ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत प्रत्यक्ष भेटून आपली वैयक्तिक माहिती नोंदवावी. अधिक माहितीकरीता विद्यार्थ्यांनी सुनिल गव्हाणे यांच्या संपर्क कार्यालयास किंवा ९३७२३३३३५७ या मोबाईल क्रमांकावरती संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.