न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयात युरोलॉजी विभागातील पहिली मोठी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. ६४ वर्षीय रुग्णास मूत्रपिंडात मोठ्या गाठीसह मधुमेहजन्य आम्लता, हृदयविकार आणि इतर गुंतागुंत होती. काटेकोर नियोजन करून जनरल अॅनेस्थेशिया अंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात आली.
अॅनेस्थेशिया टीममध्ये डॉ. अर्चना गांधी, डॉ. पूजा कुलकर्णी, डॉ. पूनम माने आणि डॉ. अर्जित रेपुरिया यांनी जबाबदारी सांभाळली. रुग्णाच्या रक्तातील साखर, श्वसन आणि रक्ताभिसरणावर विशेष लक्ष ठेवण्यात आले. शस्त्रक्रिया युरोसर्जन डॉ. सुनील पालवे व डॉ. हनुमंत फड यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. मूत्रपिंडाच्या वरच्या व खालच्या भागाजवळ असलेली तब्बल १० x १० सें.मी.ची गाठ सुरक्षितपणे काढण्यात आली.
ही शस्त्रक्रिया आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्या नेतृत्वात पार पडली. रुग्णालयप्रमुख डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. संजय सोनेकर तसेच ऑपरेशन थिएटर तंत्रज्ञ व नर्सिंग स्टाफचे योगदान मोलाचे ठरले.
“नवीन थेरगाव रुग्णालयात युरोलॉजी शस्त्रक्रिया यशस्वी होणे ही अभिमानाची बाब आहे,” असे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.













