न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. ३० ऑगस्ट २०२५) :- पिंपळे गुरव येथील देवकर पार्क परिसरात प्रेमसंबंधाच्या कारणावरून २२ जुलै रोजी एका युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींपैकी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी रवि किसन घेगट (वय ४५, टेम्पो ड्रायव्हर, रा. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा रामेश्वर घेगट (वय २६) याचा आरोपी क्रमांक ४ च्या मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यावरून आरोपींनी फिर्यादी कुटुंबाला देवकर पार्क येथील आरोपी नवीन दशरथ पिवाल यांच्या घरी चर्चेसाठी बोलावले. तेथे आरोपींनी रामेश्वरला घरात ओढून नेऊन दरवाजा बंद करून लाथाबुक्यांनी, बेल्टने मारहाण केली तसेच दोरीने गळा आवळला. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या रामेश्वरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणात एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल असून आरोपी प्रशांत व करण खोकर, सुरेंद्र, प्रशांत, सागर, अक्षय, युवराज, दोन महिला आरोपी तसेच नवीन पिवाल व विनोद सोळंकी अशी आरोपींची नावे आहेत. त्यापैकी १ ते ९ आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.
                                                                    
                        		                    
							












