प्रवास होणार आणखी सुरक्षित व सुलभ..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. ३० ऑगस्ट २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील जुन्या रेल्वे उड्डाणपुलाऐवजी नवा पूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तज्ज्ञांच्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानंतर आणि रेल्वे विभागाच्या मंजुरीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून लवकरच जुना पूल पाडून नवीन पूल उभारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरील महावीर चौकातून चिंचवड गावाकडे जाणारा पूल १९७६ मध्ये बांधण्यात आला होता. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल कमकुवत असल्याचे निष्पन्न झाल्याने येथे जड वाहने व बसेस बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढून नागरिकांना त्रास होत होता.
२०२१ व २०२२ मध्ये केलेल्या तपासणीत पुलाच्या पुनर्बांधणीची शिफारस करण्यात आली होती. डिसेंबर २०२४ मध्ये रेल्वे विभागाने यास मंजुरी दिली आणि मार्च २०२५ मध्ये प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराला कार्यादेश देण्यात आला.
आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, “नवीन पूल उभारल्याने प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होईल.” तर अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन वेळेची बचत होईल असे म्हटले. शहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी प्रकल्पाला गती मिळाल्याची माहिती दिली.
                                                                    
                        		                    
							












