न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. ३० ऑगस्ट २०२५) :- रहाटणीचे नेते व माजी नगरसेवक चंद्रकांत आण्णा नखाते आणि शुभम नखाते युवा मंच यांच्या वतीने गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी रहाटणीतील नखाते पेट्रोल पंपाजवळ भव्य विसर्जन हौद उभारण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे रहाटणी-काळेवाडी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पूर्वी नागरिकांना विसर्जनासाठी पवना नदी घाटावर जावे लागत होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव वाहत्या पाण्यात विसर्जनास प्रशासनाने बंदी घातल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. ही अडचण लक्षात घेऊन रहाटणीतच सुरक्षित व सुलभ हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या ठिकाणी घरगुती तसेच मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करता येणार असून मूर्ती दान आणि निर्माल्य संकलनाची स्वतंत्र सोय उपलब्ध आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन पार पाडले जाईल, अशी माहिती युवा नेते शुभम नखाते यांनी दिली.
चंद्रकांत आण्णा नखाते म्हणाले, “गणरायाला निरोप देताना निसर्गाची काळजी घेणे हाच खरा बाप्पाचा आशीर्वाद आहे.”










