- भाजपच्या तुषार हिंगेंकडून खदखद व्यक्त..
- शहराध्यक्षांपुढेही व्यक्त केली होती कैफ़ियत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, दि. ३० ऑगस्ट २०२५ :- भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहरात संघटनात्मक कामात उल्लेखनीय कामगिरी करत असतानाच पिंपरी मतदारसंघातील पदवाटपावरून नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या नव्या १२६ पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणीची घोषणा नुकतीच शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केली. या कार्यकारिणीत माजी उपमहापौर तुषार हिंगे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. परंतु निवड झाल्यानंतर केवळ एका दिवसातच त्यांनी वैयक्तिक कारणास्तव या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत नाराजगी जाहिर केली.
हिंगे म्हणाले की, “पिंपरी मतदारसंघात कायमच पदवाटपात अन्याय होत आला आहे. सरचिटणीस हे महत्त्वाचे पद पिंपरी विधानसभेत देणे आवश्यक होते, मात्र तसे न झाल्यानेच मी नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला आहे.”
ते पुढे म्हणाले की, पिंपरी मतदारसंघात भाजपचे अनेक कार्यकर्ते सातत्याने संघटनात्मक काम करीत आहेत. त्यापैकी कोणालाही हे पद देण्यात आले असते, तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असता. परंतु, पिंपरीतील कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल घेतली गेली नाही.
हिंगे यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय पक्षविरोधी नसून अन्यायाविरोधात आहे. “पिंपरीत कार्यकर्त्यांच्या मेहनतीला योग्य सन्मान मिळावा, यासाठीच मी राजीनामा दिला,” असेही ते म्हणाले.













