- उन्नती सोशल फाउंडेशनच्या समाजप्रबोधनपर उपक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ३१ ऑगस्ट २०२५) :- पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या हस्ते आरती करण्याची परंपरा उन्नतीने कायम ठेवली आहे. यंदा या परंपरेला पुढे नेत, रविवारी (दि. ३१) सकाळच्या आरतीचा मान शहराचे नाव स्वच्छतेच्या बाबतीत उंचावणाऱ्या सफाई कामगार महिलांना देण्यात आला.
याप्रसंगी उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय तात्याबा भिसे, विठाई वाचनालयाचे सभासद, आनंद हास्य क्लबचे सभासद, ऑल सिनियर सिटिझन्स असोसिएशनचे सदस्य, तरुण वर्ग तसेच पिंपळे सौदागर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे समाजात समानतेचा, ऐक्याचा आणि सन्मानाचा संदेश दृढ होत असून, गणेशोत्सव अधिक अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्यास मदत होत असल्याची भावना उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली.
उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे यांनी सफाई कामगार महिलांचा आदरपूर्वक सन्मान केला. त्यांनी सांगितले की, “गणेशोत्सव हा केवळ आनंदाचा सण नसून, समाजातील प्रत्येक घटकासाठी समानतेचा, सन्मानाचा आणि एकतेचा संदेश देणारे पर्व आहे. उन्नतीच्या वतीने दरवर्षी स्त्रीशक्तीचा जागर करण्याचा उपक्रम राबवला जातो. आतापर्यंत महिला पोलीस, वकील, डॉक्टर, नर्स, शिक्षिका, आयटी इंजिनिअर,दिव्यांग मुली,तृतीयपंथी, विधवा, खेळाडू महिला, शिक्षक,समाजसेविका, आशा स्वयंसेविका अशा विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करून त्यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्याची संकल्पना आम्ही राबवली आहे.”
आरतीचा मान मिळालेल्या सफाई कामगार महिलांपैकी आशा चौधरी म्हणाल्या, “आम्ही रोज रस्ते, गल्लीबोळ स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत करतो. पण समाजात आपल्याकडे फारसं कोणी लक्ष देत नाही. आज गणपती बाप्पाच्या आरतीचा मान आम्हाला देऊन उन्नती सोशल फाउंडेशनने आमचा सन्मान केला. ही आयुष्यातली अविस्मरणीय भावना आहे. समाजात आपल्या कामाचे कौतुक व्हावे, हीच अपेक्षा आहे. आज मिळालेला सन्मान आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.”
















