न्यूज पीसीएमसी नेटवर्क
खेड (दि. ०३ सप्टेंबर २०२५) :- कुरुळी गावातील सोनवणे वस्ती येथे परवानाधारक रिव्हॉल्वर हाताळताना झालेल्या निष्काळजीपणामुळे स्वतःच्या पायात गोळी लागून एक शेतकरी जखमी झाला. या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, २७ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास मयुर गुलाब सोनवणे (वय ३५, व्यवसाय शेती, रा. कुरुळी) याने आपल्या परवानाधारक रिव्हॉल्वरचा वापर करताना परवान्याच्या अटी व शर्तींचे पालन केले नाही. दरम्यान, निष्काळजीपणामुळे रिव्हॉल्वरमधून अचानक राऊंड फायर झाला. यात गोळी त्यांच्याच डाव्या पायाला लागून ते गंभीर जखमी झाले.
या घटनेनंतर पोलिस शिपाई सदाशिव नाईकनवरे यांनी तक्रार दाखल केली असून, शस्त्र अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मयुर सोनवणे यांना अद्याप अटक झालेली नाही. तपास सहायक पोलीस निरीक्षक राकेश गुमाने करत आहेत.










