- शेतकऱ्याच अडीच लाखांच नुकसान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
महाळुंगे (दि. ०३ सप्टेंबर २०२५) :- औद्योगिक कंपन्यांकडून सोडण्यात आलेल्या सांडपाण्यामुळे महाळुंगे इंगळे गावातील एका शेतकऱ्याच्या १८ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात कंपन्यांच्या प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर रोजी संध्याकाळी बाळु दामु कोकरे (वय ४०, व्यवसाय – मेंढीपालन, रा. एच. पी. चौक, महाळुंगे) आपल्या पत्नीसमवेत विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानजवळील मोकळ्या जागेत मेंढ्या चारत होते. दरम्यान, शेजारील कंपन्यांकडून नाल्यात सोडण्यात आलेले प्रदूषित पाणी त्या जागेत आले. हे पाणी पिल्याने १८ मेंढ्यांपैकी १७ मादी व एक नर मेंढा अचानक मृत पडले. मृत मेंढ्यांच्या नाका-तोंडातून फेस व पाणी बाहेर आल्याचे आढळले.
या घटनेत शेतकऱ्यांचे सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रदूषित पाणी सोडल्यास माती, पाणी आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान होईल हे माहिती असूनही कंपन्यांच्या प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम सह पर्यावरण संरक्षण अधिनियम व पाणी (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस मुल्ला करीत आहेत.










