- परवानगी घ्या अन्यथा कारवाई..
- पीएमआरडीए आयुक्तांचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी (दि. ४ सप्टेंबर २०२५) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई सुरू झाली आहे. आतापर्यंत आलेल्या १८ तक्रारींपैकी शहानिशीनंतर ८ जणांवर गुन्हे नोंदवले असून उर्वरित १० प्रकरणांची पडताळणी सुरू आहे. पंचनाम्यानंतर दोषी आढळल्यास त्यांच्या बांधकाम परवानग्याही थांबवण्यात येणार असल्याचा इशारा महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिला.
पीएमआरडीएच्या आकुर्डी कार्यालयात झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. वृक्षतोडीबाबत अर्ज आल्यानंतर अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करूनच निर्णय घेतात. त्यामुळे नागरिक व विकसकांनी परवानगी घेऊनच पुढील कार्यवाही करावी, असे आवाहन त्यांनी केले.
पर्यावरण संवर्धनासाठी पीएमआरडीए महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत असून अनधिकृत वृक्षतोड थांबवण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, संचालक अविनाश पाटील, वृक्ष अधिकारी महेश पाटील यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.















