न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, दि. ५ सप्टेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिका गणेश विसर्जन सुरक्षित, सुरळीत व पर्यावरणपूरक पार पडावे यासाठी सज्ज झाली आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य, पर्यावरण, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन अशा विभागांतर्फे विशेष नियोजन करण्यात आले आहे.
शहरातील २७ अधिकृत विसर्जन घाटांवर प्रकाशयोजना, वैद्यकीय सुविधा, पार्किंग, वाहतूक व्यवस्थापन यांसह जीव रक्षक पथके, रुग्णवाहिका, अग्निशमन यंत्रणा तैनात आहेत. मोशी खाण हे मुख्य विसर्जन स्थळ असून येथे क्रेन, रस्ते सुधारणा व सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे.
पर्यावरणपूरक उपक्रमांवरही भर देण्यात आला आहे. कृत्रिम जलकुंडे, निर्माल्य संकलन कुंडे उभारण्यात आले असून, संकलित निर्माल्यापासून खत व सुगंधी उत्पादने तयार केली जाणार आहेत. शाडू मूर्ती संकलनासाठी २६ केंद्रे उभारली असून, पीओपी मूर्तींसाठी प्रदूषण नियंत्रणाची सोय करण्यात आली आहे.
“नागरिकांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे. विसर्जन घाटांवरील रेस्क्यू पथकांच्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
४ सप्टेंबरपर्यंत एकूण ६२,४६९ मूर्ती संकलित झाल्या असून, त्यापैकी १४,००८ पर्यावरणपूरक व ४८,४६१ पीओपी मूर्ती आहेत.
















