- सरकारी बँकांवर भरोसा नाही का?..
- राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या दबावासमोर प्रशासन झुकलं?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२५) :- महापालिकेच्या सर्व रुग्णालये व दवाखान्यांमध्ये अद्याप ऑनलाईन कॅशलेस पेमेंटची सोय सुरू झालेली नाही. त्यामुळे रुग्णांना केसपेपर व बिलासाठी रोख रक्कम भरावी लागत असून नातेवाईकांना मोठी धावपळ सहन करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर खासगी क्षेत्रातील ‘सबपैसा पेमेंट गेटवे’ या कंपनीला थेट काम देण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आले आहे.
सध्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये महापालिकेची खाती असून, त्यांच्यामार्फतच ही सुविधा सुरु करता येऊ शकते. मात्र, महापालिका प्रशासनावर राजकीय दबाव आणून एका खासगी कंपनीकडे काम वळविण्याचे प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे.
रोखीच्या व्यवहारांमुळे गैरसोयी…
रुग्णालयात रोख पैसे भरण्यासाठी अनेकदा रांगा लागतात. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांमध्ये अस्वस्थता वाढते. कर्मचारी व नागरिकांमध्ये वादाच्या घटना देखील घडल्या आहेत. सरकारी क्षेत्रात कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य दिले जात असताना महापालिकेची रुग्णालये मात्र मागे पडली आहेत.
प्रशासनाचे स्पष्टीकरण…
महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाकडून काही रुग्णालयांना ६० कार्ड स्वाईप मशीन देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र बँकेमार्फत ऑनलाईन सुविधा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच ती अमलात येईल, असे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी देखील, “मशीन उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. सबपैसा कंपनीबाबत आरोग्य विभागाला कोणतीही अधिकृत माहिती नाही,” असे सांगून गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला.













