- सुनावणी संपताच पंचतारांकित हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांचा सत्ताधाऱ्यांसोबत गुप्त डाव?..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या हरकतींची सुनावणी नुकतीच पूर्ण झाली. त्यानंतर लगेचच चिंचवड येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये प्राधिकृत अधिकारी, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि सत्ताधारी पक्षातील एका आमदाराची स्वतंत्र बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर “प्रभाग नकाशात बदल होणार का?” याविषयी राजकीय वर्तुळात चर्चेला जोर चढला आहे.
महापालिकेने २२ ऑगस्ट रोजी ३२ प्रभागांचे प्रारूप नकाशे प्रसिद्ध केले होते. चार सदस्यीय पद्धतीच्या या रचनेवर तब्बल ३१८ हरकती दाखल झाल्या होत्या. या सर्व हरकतींवर राज्याचे सहकार व विपणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी १० सप्टेंबर रोजी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात एकाच दिवशी सुनावणी केली.
सन २०१७ मधील प्रभागरचना भाजपच्या हिताची ठरली होती. त्या वेळी भाजपच्या नगरसेवकांची संख्या ३ वरून थेट ७७ वर गेली. त्यामुळेच यंदाही भाजपकडून जुन्या रचनेलाच पाठबळ देण्याचे प्रयत्न होत असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडून मात्र रचनेत बदल व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदवल्या गेल्या आहेत.
सुनावणीनंतर झालेल्या गुप्त बैठकीमुळे सत्ताधारी पक्षाने निवडणूक फायद्यासाठी नियमबाह्य दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांकडून होतो आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेले वरिष्ठ अधिकारीच जर सत्ताधाऱ्यांच्या सोबतीला असतील, तर निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह लागते, अशी टीकाही होत आहे. त्यामुळे शहरात आता एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे महापालिकेची प्रभागरचना फुटणार का, आणि निवडणुकीत डाव कोणाचा रंगणार?












