- एससी प्रवर्गासाठी पद राखीव होण्याची शक्यता?…
 
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड │ १२ सप्टेंबर २०२५ :- आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापौरपदाच्या आरक्षण निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रारूप प्रभागरचनेवरील हरकतींवर दि.१० रोजी सुनावणी पार पडली असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध होणार आहे.
महापालिकेवर मागील साडेतीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. आयुक्तच प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. दरम्यान, राज्य शासनाने मागविल्यानुसार २००१ पासून २०२२ पर्यंतच्या महापौर आरक्षणाचा तपशील, लोकसंख्या व माजी महापौरांची माहिती महापालिकेने नगरविकास खात्याकडे पाठविली आहे.
शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १७ लाख २७ हजार इतकी आहे. महापौरपदी यापूर्वी प्रकाश रेवाळे, मंगला कदम, डॉ. वैशाली घोडेकर, योगेश बहल, मोहिनी लांडे, शकुंतला धराडे, नितीन काळजे, राहुल जाधव व उषा ढोरे यांनी काम पाहिले आहे. या कालावधीत खुला, ओबीसी व एसटी प्रवर्गांना संधी मिळाली. आता फक्त अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठीचे आरक्षण प्रलंबित आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महापौरपद एससीसाठी राखीव होण्याची शक्यता अधिक आहे.
राज्य शासनाने महापौर पदाच्या आरक्षण निश्चितीसाठीची माहिती मागविली होती. त्यानुसार, आजपर्यंतच्या महापौरपदाचा आरक्षण सुरू झालेल्याचा आणि संपुष्टात आलेल्याचा कालावधी, लोकसंख्येची माहिती पाठविली आहे. – अविनाश शिंदे, सहायक आयुक्त- पिंपरी-चिंचवड महापालिका…
                                                                    
                        		                    
							











