- हिंजवडीतील वाहतूक कोंडीवर वाहतूक विभागाचा महत्वपूर्ण निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १३ सप्टेंबर २०२५) :- हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत आता हिंजवडी-वाकड उड्डाणपुलावर दुचाकींना ठराविक वेळेत प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.
नवीन नियमानुसार सकाळी ८ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ९ या शिखर काळात दुचाकींना उड्डाणपुलावरून जाण्यास मज्जाव असेल. यासाठी परिसरात फलक उभारण्यात आले असून, वाहतूक वॉर्डन व पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे यांनी सांगितले, “वरिष्ठांच्या आदेशानुसार ही अंमलबजावणी सुरू असून दुचाकीस्वार याला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे निश्चितच वाहतूक कोंडी कमी होईल.”
वाहतूक नियोजनानुसार सकाळी वाकड ते हिंजवडी अशा तीन लेनमधून वाहने जाऊ शकतील, तर सायंकाळी हिंजवडीहून वाकडच्या दिशेने तीन लेन उघड्या राहतील. या उपाययोजनेमुळे दररोजच्या प्रचंड कोंडीतून वाहनधारकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.













