- भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीची शक्यता?..
 - शहर भाजपची पारंपरिक मित्रपक्षाला पसंती?…
 - राष्ट्रवादी (अजित पवार गट) अडचणीत?..
 
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. १३ सप्टेंबर २०२५) :- आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील दोन प्रमुख घटक भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यात युती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष शहरात पारंपरिकपणे मजबूत संघटन व मतदाराधार असलेले पक्ष म्हणून गणले जातात. फुटीनंतर शिवसेना (शिंदे गट) गेल्या काही वर्षांत स्थानिक पातळीवर सक्रिय झाली आहे. त्यामुळे या दोन पक्षांची युती झाल्यास मतविभागणी टळून महायुतीला थेट लाभ होऊ शकतो, अशी कुजबूज दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप तब्बल शंभर जागांवर उमेदवार उभे करण्याच्या तयारीत असून, शिवसेना (शिंदे गट) अठ्ठावीस जागांवर लढण्याच्या तयारीत असल्याचे समजते. या जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय दोन्ही पक्षांचे पक्षश्रेष्ठीच घेणार असले तरी, खाजगीत दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेतेमंडळींमध्ये या पर्यायावर सकारात्मक विचार-विमर्श सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
या घडामोडींचा थेट परिणाम महायुतीतील तिसऱ्या घटक पक्षावर, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) वर होऊ शकतो. भाजप–शिवसेनेची युती झाल्यास शहरातील पारंपरिक मतदारांमध्ये महायुतीचे वर्चस्व वाढेल. त्यामुळे राष्ट्रवादीला अपेक्षित जागा मिळवणे कठीण ठरू शकते, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
२०१७ साली कोणाला किती जागा ?… 
• भाजपा – ७७
• राष्ट्रवादी काँग्रेस (एकसंघ) – ३६
• शिवसेना एकसंघ) – ०९
• महाराष्ट्र नवनिर्माण सेना – ०१
• अपक्ष – ०५
• एकूण – १२८
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक ही नेहमीच राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचा मानबिंदू ठरते. गेल्या काही वर्षांपासून पिंपरी चिंचवड हा भाजपचा पारंपरिक गड आणि शिंदे गटाच्या सक्रियतेमुळे निर्माण होणारी नवीन समीकरणे ही आगामी निवडणुकीतील राजकीय रंगत वाढवणारी ठरणार आहेत. भाजप-शिवसेना युती निश्चित झाल्यास विरोधकांसाठी निश्चितच ही निवडणूक आणखी कठीण होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
स्थानिक पातळीवर अशा प्रकारचा कुठलाच फाॅर्मुला ठरलेला नाही. अशी कुठलीही चर्चाही नाही. भविष्यात राजकीय समीकरण कसे असेल, हे कोणीही सांगू शकत नाही. महायुतीतील नेते आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे पक्षश्रेष्ठी याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेतील.
– शत्रुघ्न (बापु) काटे – शहराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी…असा कुठलाही निर्णय झालेला नाही. निवडणूक जवळ आल्याने काहीजण फक्त अंदाज वर्तवत असतात. शिवसेना पक्षश्रेष्ठी, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या आणि महायतीच्या नेतृत्वातच आगामी निवडणुकांना आम्ही सामोरे जाणार आहोत.
– निलेश तरस, शहराध्यक्ष, शहर शिवसेना (एकनाथ शिंदे)…
                                                                    
                        		                    
							












