न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १५ सप्टेंबर २०२५) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) दीर्घकाळापासून रखडलेली पदभरती आता गतीमान झाली आहे. मुख्य अभियंता ते लिपीक या १५ संवर्गांत एकूण ६३ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले असून, प्रतिनियुक्तीद्वारे ही रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
गेल्या महिन्यात प्रशासन विभागाने यासंदर्भात अधिसूचना काढली होती. त्यावर १५३ अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रतिनियुक्तीवर दोन वर्षांची सेवा झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांचा कायमस्वरूपी समावेश करण्याची शक्यता देखील अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.
सध्या पीएमआरडीएमध्ये अनेक विभागात मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे बहुतांश कामकाज कंत्राटी पद्धतीने चालवावे लागत आहे. मात्र, त्याला मर्यादा आल्याने ही नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, आरेखक, अग्रिशमन अधिकारी, लिपीक, टंकलेखक अशा विविध पदांचा यात समावेश आहे.
याशिवाय दीडशे पदांच्या भरतीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. त्यातील काही पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून तर काही जिल्हा निवड समितीमार्फत भरण्यात येणार आहेत. “आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी शासनाच्या मंजुरीनंतर पुढील टप्प्याची कार्यवाही केली जाईल,” असे सहआयुक्त (प्रशासन) पूनम मेहता यांनी सांगितले.















