न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०१९) :- राज्य सरकारच्या समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या मोफत पुस्तकांचा पुरवठा शहरातील उन्नत केंद्रांना करण्यात आला आहे.
सध्या इयत्तेनुसार व माध्यमानुसार पुस्तक संच विभागणीचे काम सुरु आहे .येत्या ३ ते ११ जून दरम्यान सर्व शाळांच्या मुख्याध्याकांना पुस्तक वाटप करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रशासन अधिकारी ज्योत्ना शिंदे यांनी दिली.
शिक्षण विभागाच्या मागणीप्रमाणे बालभारतीने सुमारे एक लाख १४ हजार ७९० विद्यार्थ्यांसाठी सहा लाख ३९ हजार ५९४ पुस्तकांचा पुरवठा केला आहे. दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. त्यामध्ये मराठी, हिंदी आणि उर्दू माध्यमांच्या अनुदानित शाळांचा समावेश असतो. एकूण सहा प्रभागांचे दोन उन्नत केंद्र आहेत. या केंद्रांच्या अखत्यारीतील शाळांना पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. पिंपरी उन्नत केंद्राअंतर्गत पिंपरी वाघेरे येथील कै. भाऊसाहेब पाटील विद्यालयात व आकुर्डी उन्नत केंद्रातील वसंतदादा प्राथमिक शाळा या दोन उन्नत केंद्रांमध्ये पुस्तके ठेवण्यात आली आहेत. या वर्षी ६०० हून अधिक शाळांना पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात नवी कोरी पुस्तके पडणार आहेत.











