न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरात ‘पुणे दर्शन’ च्या धर्तीवर ‘पिंपरी चिंचवड दर्शन’ बस सुरू करण्यासाठी प्रशासन विचाराधीन असून, त्यासंदर्भातील कार्यवाही करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पिंपरी चिंचवड बससेवा सुरू करण्यासंदर्भात गुरुवार (दि. ३० मे) रोजी पीएमपीएमएलच्या पुणे कार्यालयातील वरिष्ठ अधिका-यांची बैठक झाली.
यासंदर्भात कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच सेवा सुरू होणार की नाही, हे स्पष्ट होईल. ‘पिंपरी चिंचवड दर्शन’ बससेवेच्या माध्यमातून कोणती स्थळे दाखविण्यात येणार आहेत, या बसचा मार्ग कसा असणार आहे, हे अजून निश्चित झाले नसल्यामुळे अधिका-यांकडून यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.
याबाबत अध्यक्षा नयना गुंडे यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा अनेक प्रेक्षणीयस्थळे आहेत. पिंपरी चिंचवडला पुणे या दर्शनप्रमाणे बससेवा असावी, अशी मागणी लोकांनी केली होती. त्यामुळे आम्ही सेवा सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करत आहोत.











