न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. १७ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रहाटणी उपअग्निशमन केंद्रामार्फत वाकड परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मंगळवारी (दि. १६) मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपत्कालीन परिस्थिती व अग्निदुर्घटनेच्या प्रसंगी नागरिकांची व हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका कशी करावी याबाबत मार्गदर्शनासह प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
मॉक ड्रिल सहाय्यक आयुक्त (अग्नि) उमेश ढाकणे आणि उपअग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांच्या आदेशानुसार, प्रभारी उपअग्निशमन अधिकारी विजय घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मॉक ड्रिल मध्ये अग्निशमन विभागातील अधिकारी, स्थायी कर्मचारी, शिकाऊ जवान,सहभागी झाले हिते. तसेच यावेळी हॉटेल व्यवस्थापन प्रतिनिधी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मॉक ड्रिलमध्ये आग लागल्यास धुरामुळे होणारा गुदमरण्याचा धोका, लिफ्टचा वापर टाळणे, जिन्यांचा वापर करून बाहेर पडणे, हॉटेल व्यवस्थापनाने अग्निशमन यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करणे, तसेच अग्निशमन विभागाशी त्वरेने संपर्क साधणे या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून अग्निशामक सिलिंडरचा वापर कसा करावा, धुरातून सुरक्षितपणे बाहेर कसे पडावे, तसेच बचाव कार्य करताना कोणती काळजी घ्यावी हे प्रात्यक्षिकातून दाखवून दिले.
हॉटेलमध्ये हजारो नागरिक व कर्मचारी दररोज ये-जा करतात. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाची योग्य तयारी व आपत्कालीन परिस्थितीत तातडीची सुटका करणे अतिशय महत्त्वाचे आहे. या मॉक ड्रिलमुळे हॉटेल कर्मचार्यांचा आत्मविश्वास दृढ झाला आहे. आमचे उद्दिष्ट फक्त प्रात्यक्षिक दाखवणे नाही, तर प्रत्यक्ष परिस्थितीत कर्मचारी घाबरून न जाता त्वरित निर्णय घेऊ शकतील याची खात्री करणे आहे. हॉटेल व्यवस्थापनाने देखील सतत प्रशिक्षण व उपकरणांची तपासणी करणे आवश्यक आहे. अशा सरावांमुळे प्रशासन, हॉटेल व्यवस्थापन व नागरिक यांच्यात समन्वय अधिक मजबूत होतो.
– विजय घुगे, प्रभारी उपअग्निशमन अधिकारी, अग्निशमन विभाग…