न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. १७ सप्टेंबर २०२५) :- केंद्र सरकारच्या “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानाचा शुभारंभ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयांत आज झाला. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते कै. ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय, आकुर्डी येथे दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी खासदार अमर साबळे, आयुक्त शेखर सिंह, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदौर येथे झाला. शहरातील तालेरा, यशवंतराव चव्हाण स्मृती व भोसरी रुग्णालयांतही मान्यवरांच्या उपस्थितीत उपक्रम सुरू करण्यात आले. एकाच दिवशी २१०० हून अधिक महिला व बालकांनी तपासण्या, पोषण मार्गदर्शन व उपचारांचा लाभ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अभियानात उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, क्षयरोग तपासणी, गर्भवती महिलांची तपासणी, पोषण समुपदेशन, किशोरींसाठी विशेष सत्रे तसेच आयुष्मान भारत योजनांतर्गत लाभ देण्यात येत आहेत. मनपाच्या ८ रुग्णालये व २७ दवाखान्यांमध्ये २ ऑक्टोबरपर्यंत शिबिरे सुरू राहणार असून नागरिकांनी व्यापक लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले.