न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे १६ लाचखोर निलंबित अधिकारी व कर्मचा-यांना पुन्हा सेवेत घेतल्याने पालिकेची प्रतिमा जनमानसात मलीन झाल्याची कबुली महापौर राहुल जाधव यांनी गुरुवारी (दि. ३०) रोजी दिली आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी न्यायालयीन प्रक्रियेतून निर्दोष मुक्त झाल्यानंतर त्यांना पुन्हा सेवेत घ्यावे. त्यापूर्वीच त्यांना रुजू करून घेण्याचा निर्णय रद्द करावा, असे स्पष्ट सूचना त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिल्या आहेत.
महापौर जाधव यांनी या संदर्भात गुरुवारी सदर मागणी केली आहे. महापौरांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचा-यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या गुन्ह्यातील दोषींना पालिकेने सेवेतून निलंबित केले आहे. त्यांच्यावर न्यायालयात प्रकरण सुरू आहेत. या प्रकरणाचा निकाल प्रलंबित आहे. असे असताना पालिकेच्या निलंबन आढावा समितीच्या शिफारशीनुसार सदर निलंबित अधिकारी व अशा कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करून, त्यांना पुन्हा सेवेत रूजू करून घेतले आहे. त्यामुळे पालिकेची जनमानसातील प्रतिमा मलीन झाल्याची नाराजगी जनतेतून व्यक्त होत आहे.
आर्थिक गैरव्यवहारामळे पालिकेची मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. सदर आदेशामुळे पालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर जनसामान्यांतून प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. तसेच, विविध माध्यमांतून पालिकेच्या कारभारावर मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. त्यामुळे पालिकेतील अधिकारी व कर्मचा-यामध्ये अशा प्रवृत्तीस चालना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे सदर आदेश रद्द करून न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतरच कार्यवाही करावी, अशी सूचना महापौरांनी आयुक्तांना या निवेदनात केली आहे.











