- पाणीपट्टी व मालमत्ता करातील ३,४२४ प्रकरणे निकाली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. १९ सप्टेंबर २०२५) :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित लोकअदालतीत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपट्टी आणि मालमत्ता कराची तब्बल ५ कोटी १४ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली.
या लोकअदालतीत ३,४२४ प्रकरणांचा निकाल लागला. त्यापैकी २,४८१ पाणीपट्टी थकबाकीदारांकडून ३ कोटी १४ लाख तर ९४३ मालमत्ता कर थकबाकीदारांकडून २ कोटी रुपये महसूल संकलित झाला. विशेष म्हणजे, ८३४ मालमत्ताधारकांनी ऑनलाइन कर भरून ४ टक्के सवलतीचा लाभ घेतला.
महापालिकेच्या कर संकलन विभागाने नोटिसा व संदेश पाठवून थकबाकीदारांना कर भरण्यास प्रवृत्त केले. या उपक्रमामुळे महसूल वाढीस मदत झाली असून, “पुढील काळात थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई होईल,” असा इशारा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिला. तर “लोकअदालतीमुळे वसुली शक्य झाली,” असे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.












