- चिंचवड स्टेशन परिसरातील मार्ग बंद; नागरिक त्रस्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (सोमवार, दि. २२ सप्टेंबर २०२५) :- शहरात मेट्रोचे चिंचवड ते निगडी विस्तारीकरणाचे काम सुरू असून सुरुवातीला निगडीपासून कामाला प्रारंभ झाला. मात्र, अद्याप तेथील काम पूर्ण झाले नाही आणि अत्यंत संथ गतीने सुरू आहे.
नव्या टप्प्यात चिंचवड स्टेशन येथील मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे निगडी ते चिंचवड स्टेशनदरम्यानचा सर्व्हिस रस्ता अतिशय खराब झाला असून, दैनंदिन वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सध्या चिंचवड स्टेशन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महावीर चौक हा मार्ग बंद करण्यात आला आहे. याऐवजी निगडीकडून येणाऱ्या वाहनांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून डावीकडे वळून बीएसएनएल कार्यालयासमोरून उजवीकडे वळत महावीर चौकातून पुढे जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मात्र, या रस्त्यावर आधीच वाहनांची संख्या मोठी असल्याने आता वाहतूक कोंडी अधिकच वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून, मेट्रो कामाचा वेग वाढविण्याची मागणी होत आहे.













