न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०१९) :- महापालिकेच्या वतीने भोसरी सव्हें नंबर एकमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षणाच्या अद्ययावत केंद्राची उभारणी सुरू आहे. त्याचे पंचाहत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे. येणाऱ्या पाच महिन्यांत हे काम पूर्ण करून ते मल्लांना खुले करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासन विभाग आणि प्रशासन लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत.
सर्व्हे नंबर एकमध्ये एक व दोन टप्प्यांत एकुण अंदाजे २१ कोटी रूपये खर्च करून प्रशिक्षण केंद्र उभे करण्यात येत आहे. त्यांपैकी ९ कोटी रूपयांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. जागेचे क्षेत्रपळ ८६०० चौ. मी . तर बांधकाम क्षेत्रफळ ५५११ चौ. मी. आहे. सदरची इमारत आर. सी. सी. फ्रेम स्ट्रक्चर असून तळघर, तळमजला, पहिला मजला अशा या स्वरूपात आहे.
इमारतीच्या तळघरात स्वयंपाकगृह, भोजनकक्षाची सुविधा असून तळमजल्यावर स्वागतकक्ष, प्रशासकीय विभाग व महिला पुरूषांसाठी स्वतंत्र २ जिम हाँल आहेत. पहिल्या मजल्यावर कुस्ती स्पर्धेसाठी मॅट, १२०० ते १५०० प्रेक्षकांसाठी प्रेक्षागृह, उपाहारगृह, स्वच्छतागृह, खेळाडूंसाठी विश्रामगृह इत्यादींचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे.
दुस-या टप्प्याचे काम दिलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कामाच्या गुणवत्तेमध्ये कुठेही तडजोड न करता काम सुरू आहे. याठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मार्गदर्शन मिळणार असल्याने त्या दर्जाचेच काम सुरू आहे.
– संजय घुबे, कार्यकारी अभियंता ‘ई’ क्षेत्रीय कार्यालय











