न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून प्लास्टिक बाळगणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई थेरगाव परिसरात करीत दुकानदारांकडून पंधरा हजाराचा दंड वसूल करण्यात आला. महापालिकेचे विशेष पथकाकडून प्लास्टिक बंदीसाठी कारवाई सुरु आहे.
थेरगाव ते आनंद पार्क येथे १६ दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एका दुकानदारांकडून साडेचार किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच एका दुकानदारावर दुस-यांदा प्लास्टिक ग्लास व पिशव्या आढळल्याने त्यांना महापालिकेच्या शासकीय नियमानुसार दहा हजार रुपयांचा दंड ठोठाण्यात आला आहे. तसेच शहराचे विद्रुपीकरण करण्याबाबत रजक अॅकॅडमी या नावाने विना परवाना प्लेक्स बँनर डांगे चौक, वाकड रोड येथे लावल्याने त्यांच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला.
एका दुकानदाराला कच-याबाबत ५०० रुपयांचा दंड केला असे, एकूण मिळून पंधरा हजार पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई सहाय्यक आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य निरिक्षक आर. एस. बेदरण आणि एस. बी. चन्नाल यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आली.











