- अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांची पाहणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २६ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुभाजकांवर आणि फुटपाथवर देशी प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त व प्रशासक शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाच्या संरक्षणासाठी व्यापक नियोजन करण्यात आले असून त्याचा आढावा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी घेतला.
नेहरूनगर, स्पाईन रोड, टेल्को रोड, बिर्ला हॉस्पिटल रोड, वाकड, कस्पटे वस्ती आदी परिसरांतील वृक्षारोपणाची पाहणी करताना त्यांनी झाडांची निगा, जिओ-फेन्सिंग, पाणीपुरवठा आणि छाटणीबाबत सूचना दिल्या. झाडांभोवती प्लास्टिक वा कचरा नसावा, झाडांना बांबू ट्री गार्ड बसवावेत आणि दोन झाडांमध्ये नियमापेक्षा जास्त अंतर ठेवू नये, असे निर्देश त्यांनी दिले. कामात हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचेही आदेश दिले.
यावेळी मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांच्यासह उद्यान विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जांभळे पाटील यांनी वाकडमधील शहीद अशोक कामटे उद्यानालाही भेट देऊन स्वच्छता, सुरक्षाव्यवस्था व प्रकाशयोजना सुधारण्याचे निर्देश दिले.












