- सार्वजनिक वाहतुक वापरण्याचा मेट्रोचा प्रवाशांना सल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २६ सप्टेंबर २०२५)
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी ते दापोडी या मार्गावर मेट्रो धावत असली, तरीही मेट्रो स्थानकांखाली किंवा परिसरात पार्किंगची कोणतीही सोय उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांची शेकडो वाहने रस्त्यांच्या कडेला आणि पदपथावर उभी केल्याने वाहतूक कोंडी व पादचाऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत.
महामेट्रोत पार्किंगची मागणी सातत्याने वाढत असली, तरी “मेट्रो स्थानकाजवळ पार्किंग झोन उभारला जाणार नाही”, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, मेट्रो प्रवाशांनी घर किंवा कामाच्या ठिकाणाहून निघताना खासगी वाहनाऐवजी पीएमपी बस, रिक्षा किंवा कॅबचा वापर करावा. त्यामुळे पार्किंगची गरज भासणार नाही.
अनेक प्रवासी सकाळी वाहन लावून रात्री उशिरा ती घेऊन जात असल्याने जागा दिवसभर अडकून पडते. परिणामी इतर प्रवाशांना अडचणी निर्माण होतात. महामेट्रोच्या निर्णयामुळे स्टेशन परिसरातील पार्किंगची समस्या कायम राहणार असून, बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीवर ताण वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.












