न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २६ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिका व दिव्यांग भवन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग नागरिकांची अचूक नोंद घेण्यासाठी व्यापक सर्वेक्षण मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेसाठी आशा सेविकांना विशेष प्रशिक्षण निगडीतील ग.दि. माडगूळकर सभागृहात देण्यात आले.
महापालिका आयुक्त व प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त ममता शिंदे यांच्या अधिपत्याखाली हे प्रशिक्षण झाले. यावेळी समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, प्रकल्प संचालक विजय कान्हेकर यांच्यासह अधिकारी व आशा सेविका उपस्थित होत्या.
आशा सेविकांना दिव्यांग व्यक्तींची ओळख, संवाद कौशल्य, तसेच डिजिटल अॅपच्या माध्यमातून माहिती संकलन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. २०१६ च्या दिव्यांग हक्क कायद्यानुसार २१ प्रकारचे दिव्यांगत्व सर्वेक्षणात समाविष्ट करण्यात येणार आहे.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “या सर्वेक्षणाचा उद्देश केवळ आकडेवारी नव्हे तर दिव्यांगांचे सशक्तीकरण आहे.” अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी हा उपक्रम सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगितले, तर उपायुक्त ममता शिंदे यांनी हे प्रशिक्षण दिव्यांग सशक्तीकरणाची महत्त्वाची पायरी ठरेल असे स्पष्ट केले.












