न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी, (दि. २५ सप्टेंबर २०२५) :- मोशीतील हवलदार वस्ती (वाय पॉइंट चौक) येथे टेम्पो ड्रायव्हरवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार आहे.
फिर्यादी विशाल गणेश वाव्हळ (वय २३, धंदा टेम्पो ड्रायव्हर, रा. मरकळ, ता. खेड) आपल्या मित्रांसह थांबला असताना, आरोपींच्या रिक्षातून आलेल्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. आरोपी शिवतेज ठाकरे याने “दारु पिण्यासाठी का आला नाहीस” म्हणून मित्र स्वप्नील सकट याला शिवीगाळ करून मारहाण केली. सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादीवर आरोपी आकाश गायकवाड, ऋतिक गायकवाड व गणेश वहिले यांनी लाकडी दांडक्याने हल्ला केला. दरम्यान आरोपी राहूल लोहार याने हातातील कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली.
पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वप्नील सकटच्या पाठीवर दांडक्याने प्रहार झाला, तर फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी करत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या गुन्ह्यात भा.दं.वि., भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि पाटील करीत आहेत.












