न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२५) :- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल, रहाटणी येथे महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त भव्य संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन प्रतिक्षा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक श्री. अरुण चाबुकस्वार, उपमुख्याध्यापक श्री. सचिन कळसाईत, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या निमित्ताने शाळा परिसराची स्वच्छता करण्यात आली तसेच शाळा–शिवार चौक–शाळा असा मार्गक्रमण करीत स्वच्छता रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान “झाडे लावा झाडे जगवा”, “स्वच्छ पिंपरी चिंचवड सुंदर पिंपरी चिंचवड”, “साफ सफाई करूया आजार हटवूया”, “माझा परिसर स्वच्छ ठेवा – पुढील पिढीसाठी चांगली देणगी द्या” अशा प्रभावी घोषणांद्वारे रहाटणी व पिंपळे सौदागर परिसरात स्वच्छतेबद्दल जनजागृती करण्यात आली. शाळेतील पाचवी ते दहावीतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रतिक्षा शिंदे यांनी भूषविले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले तसेच महापुरुषांच्या कार्याबद्दल प्रेरणादायी माहिती दिली. डिंपल काळे, समृद्धी वाघमारे व उर्मिला ठोंबरे यांनी भाषणे केली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण होऊन समाजात सकारात्मक संदेश पोहोचविण्यात आला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन स्वाती वक्टे यांनी तर आभारप्रदर्शन सारिका देशमुख यांनी केले.












