- दोन आठवड्यांत नेफ्रोलॉजिस्टची नेमणूक करण्याचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी | सोमवार, ६ ऑक्टोबर २०२५ :- पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख यशवंतराव चव्हाण स्मृती (YCM) रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर आमदार अमित गोरखे आक्रमक झाले आहेत. रुग्णालयात डायलिसिस सेंटर असूनही किडनी आजारांवरील उपचारासाठी आवश्यक नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर नसल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गरीब आणि सामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयांचा रस्ता धरावा लागतो, आणि त्यांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो.
या गंभीर परिस्थितीवर आमदार गोरखे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, महानगरपालिका आयुक्तांना दोन आठवड्यांच्या आत नेफ्रोलॉजिस्टची नेमणूक करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, शासकीय रुग्णालय असूनही नागरिकांना उपचारांसाठी इतरत्र जावे लागणे ही महानगरपालिकेची गंभीर चूक असून, हा प्रशासनाचा अक्षम्य गलथानपणा आहे.
किडनीसारख्या गंभीर आजारांसाठी आवश्यक औषधांचा पुरवठा रुग्णालयात पर्याप्त प्रमाणात असावा आणि रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही आमदार गोरखे यांनी केली. त्यांनी चेतावणी दिली की, या निर्देशांची अंमलबजावणी न झाल्यास पुढील काळात कठोर भूमिका घ्यावी लागेल.
दरम्यान, आमदार गोरखे यांनी पूर्वीच आयुर्वेदिक ओपीडी सुरू करण्याची मागणी केली होती. त्या संदर्भात आयुक्तांनी आश्वासन दिले असले, तरी आजतागायत ती ओपीडी सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासन आरोग्यविषयक सेवेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
गोरखे यांनी स्पष्ट केले की, नागरिकांना दर्जेदार आणि मोफत आरोग्यसेवा मिळावी, हे महापालिकेचे प्राथमिक कर्तव्य आहे. मात्र, YCM रुग्णालयातील विद्यमान स्थिती पाहता प्रशासनाने जबाबदारी टाळल्याचे स्पष्ट दिसते. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे थांबवावे आणि तात्काळ ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.