- शिवसेनेच्या माजी शहरप्रमुखांसह राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांची डोकेदुखी वाढणार?..
- शिवसेना खासदारांकडून पुत्रासाठी सेफ गेम?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी | मंगळवार, ७ ऑक्टोबर २०२५ :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली असून, या रचनेवरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाला अनुकूल तर ठाकरे गट आणि अजित पवार गटास धक्का देणारी रचना झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.
तीन प्रभागांमध्ये बदल करण्यात आले असून, त्यापैकी दोन प्रभाग भोसरी विधानसभा क्षेत्रातील तर एक प्रभाग चिंचवड मतदारसंघातील आहे. या फेरबदलांमुळे अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षित असलेले प्रभाग नव्या भागांत गेले आहेत, त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांच्या गणितात गडबड झाली आहे.
बारणे आणि लांडगे यांच्या मतदारसंघात फेरबदल…
भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रभावक्षेत्रात झालेल्या या रचनेतील बदलांमुळे दोघांनाही राजकीय फायदा मिळाल्याची चर्चा आहे. प्रभाग क्रमांक २४ (पदमजी पेपर मिल-गणेशनगर) मधील म्हातोबा वस्ती हा भाग प्रभाग २५ वाकडला जोडण्यात आला आहे. त्यामुळे या प्रभागातील अनुसूचित जातीची मतदारसंख्या घटल्याने येथील आरक्षण रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील निवडणुकीत याच प्रभागातून शिवसेनेचे सचिन भोसले निवडून आले होते, मात्र आता त्यांचा प्रभाग आरक्षित राहणार नाही. याच भागात खासदार बारणे यांचे पुतणे नीलेश बारणे हे नगरसेवक असून, यंदा त्यांचा मुलगा विश्वजित बारणे यांच्या इच्छुकतेची चर्चा आहे. त्यामुळे बारणे कुटुंबाचा राजकीय फायदा साधण्यासाठीच हा बदल करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.
भोसरी-चिखलीतही मोठी उलथापालथ…
प्रारूप प्रभाग रचनेत चिखली (प्रभाग १) मध्ये असलेली ताम्हाणेवस्ती अंतिम रचनेत तळवडे (प्रभाग १२) येथे जोडण्यात आली आहे. तळवडेतील चारही नगरसेवक राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) असल्याने या गटावर बदलाचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्याचबरोबर ठाकरे गटाचे नेते रवी लांडगे यांच्या प्रभाग सहा मधील गावजत्रा मैदान व महापालिका हॉस्पिटल परिसर आता भोसरी गावठाणाशी जोडला गेला आहे. विधानसभा निवडणुकीत रवी लांडगे यांनी आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे हा बदल राजकीय सूडबुद्धीतून झाला, अशी चर्चा सुरू आहे.
विरोधकांचा संताप…
“आमच्या वॉर्डातील मतदारसंख्या हेतुपुरस्सर कमी करण्यात आली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव प्रभागातील मतदार दुसऱ्या ठिकाणी हलवून आमच्यावर अन्याय केला आहे. हा सत्तेचा उघड गैरवापर आहे; पण निवडणूक लढविण्याचा आमचा अधिकार कुणी हिरावून घेऊ शकत नाही,” असे शिवसेना (ठाकरे गट) चे माजी शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
राजकीय तापमान वाढले..
या बदलानंतर सर्वच पक्षांचे इच्छुक कार्यकर्ते आपला मतदार संपर्क वाढवू लागले आहेत. सोशल मीडियावर प्रचार मोहीमा सुरू झाल्या असून, स्थानिक प्रश्नांवर उपाययोजना मांडण्याची चढाओढ सुरू आहे. तिकीट मिळवण्यासाठी पक्षांतर्गत हालचालींनाही वेग आला आहे. महापालिका निवडणुकीची रणधूमाळी अजून सुरू व्हायची आहे, पण प्रभाग रचनेने सत्ताधाऱ्यांविरोधात वादळ निर्माण केले आहे, हे नक्की.