न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. १२ ऑक्टोबर २०२५) :- वाकड परिसरातील काळाखडक येथील एका लॉजमध्ये तरुणीचा प्रेमसंबंधातून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने घटनेनंतर स्वतःहून पोलिस ठाण्यात येऊन खुनाची कबुली दिल्याने पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दिलावर सिंग (वय २५, रा. पिसोळी, पुणे) हा आपल्या मैत्रीण मेरी मल्लेश तेलगु (वय २६, रा. देहूरोड) हिच्यासोबत काळाखडक येथील एका लॉजमध्ये दुपारी आला होता. त्याने तिचा मोबाईल तपासला असता तीचे दुसऱ्या व्यक्तीसोबतचे अश्लील फोटो पाहून त्याचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात त्याने सोबत आणलेल्या चाकू आणि लोखंडी पानाने वार करून तिचा जागीच खून केला.
घटनेची माहिती आरोपीने स्वतः कोंढवा पोलिस ठाण्यात जाऊन दिली. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी वाकड पोलिसांना कळवले. वाकड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मुलीचा मृतदेह मिळून आला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे.
या घटनेमुळे वाकड परिसरात खळबळ उडाली असून, प्रेमप्रकरणातून घडलेल्या या खुनामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार आहे.