न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत | मंगळवार, ७ ऑक्टोबर २०२५ :- रावेतमधील म्हस्केवस्ती येथील श्रीहरी सोसायटीत सोमवारी दुपारी घडलेल्या घटनेने काही क्षणांसाठी परिसरातील नागरिकांचा श्वास रोखला. पाच मजली इमारतीतील लिफ्ट अचानक बंद पडल्याने त्यात अडकलेल्या तीन जणांनी थरार अनुभवला. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली.
तेजस्विनी देवरे (२८), कुशल देवरे (६) आणि समृद्ध घाडगे (२३) अशी लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांची नावे आहेत. हे तिघे पहिल्या मजल्यावर जात असताना अचानक लिफ्ट थांबली आणि दरवाजे बंद झाले. क्षणात घबराट पसरली. आवाज ऐकून सोसायटीतील रहिवाशी मदतीला धावले. लिफ्ट ऑपरेटरने तत्परतेने बचावकार्य सुरू केले आणि अखेर स्थानिकांच्या मदतीने तिघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलालाही सतर्क करण्यात आले, मात्र दल घटनास्थळी पोहोचेपर्यंतच रहिवाशांनी प्रसंग हाताळला होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या प्रसंगामुळे काही क्षणासाठी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. चार दिवसांपूर्वीच चऱ्होलीतील एका सोसायटीत लिफ्टमध्ये अडकून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना हा प्रसंग घडल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.