न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बावधन | मंगळवार, ७ ऑक्टोबर २०२५ :- बावधन परिसरात वाहतूक पोलिसावर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. ६ ऑक्टोबर) दुपारी चांदणी चौकाजवळ घडली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी हनुमंत नामदेव धूमाळ (वय ४२), पोलिस हवालदार, बावधन वाहतूक विभाग, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय येथे कार्यरत असून, ते सोमवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास आपल्या सहकाऱ्यांसह नाकाबंदी करत होते. त्यावेळी फोक्सवॅगन कंपनीची जेटा कार या वाहनाचा चालक नाकाबंदी ठिकाणी आला. पोलिसांनी वाहन थांबवण्यास सांगितल्यावर चालकाने संतापाने शिवीगाळ केली आणि पोलिस हवालदार धूमाळ यांना धमकावत त्यांच्यावर हात उगारला.
आरोपीने फिर्यादीचा शर्ट पकडून त्याची दोन बटणे तोडली आणि हाताने मारहाण केली. यावेळी पोलिसांकडून त्याला ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी आरोपी शिव लक्ष्मण नळगिरे (वय ३३, रा. पुणे) याच्याविरुद्ध बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास मपोउपनि. जाधव हे अधिकारी करत आहेत.