- मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या शिरावर आयुक्तपदाची धुरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, ७ ऑक्टोबर २०२५ :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची बदली करण्यात आली असून, त्यांची नवीन नियुक्ती नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार, शेखर सिंह यांनी आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र मेट्रो रेल महामंडळ, नागपूर यांच्याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार तत्काळ स्वीकारण्याचे निर्देश सिंह यांना अपर मुख्य सचिव (सेवा) डी. राधा यांनी दिले आहेत.
साताऱ्याचे जिल्हाधिकारी असलेले शेखर सिंह यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी १६ ऑगस्ट २०२२ रोजी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्याच काळात महापालिकेवर निवडून आलेले प्रशासन बरखास्त झाल्याने त्यांनी प्रशासक म्हणूनही जबाबदारी स्वीकारली होती.
शेखर सिंह यांच्या कार्यकाळात पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक महत्त्वपूर्ण विकासकामांना गती मिळाली. त्यांच्या बदलीनंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन वादग्रस्त आयुक्त श्रावण हर्डीकर हे कामकाज पाहणार आहेत.